काठमांडू : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हा खास सोहळा पाहण्यासाठी प्रत्येकजण आतूर आहे. तर दुसरीकडे, या सोहळ्यानिमित्त नेपाळमधील जनकपूरधाम येथील जानकी मंदिर परिसरात 1.25 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. सध्या मंदिर परिसरात याची तयारी जोरात सुरू आहे.
याबाबत जानकी मंदिराचे उत्तराधिकारी महंत रामरोशन दास यांनी सांगितले की, जानकी मंदिर परिसरात 1.25 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. या मंदिरात विविध धार्मिक संस्थांच्या मदतीने 1.25 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तसेच 22 जानेवारी रोजी मंदिर व्यवस्थापकाकडून एक विशेष प्रसाद तयार केला जाईल आणि तो जनकपूरमधील सर्व रहिवाशांच्या घरी वाटला जाईल.
तसेच महंत रामरोशन दास यांनी 22 जानेवारीच्या संध्याकाळी समाजातील सर्वांना आपली घरे दिव्यांनी उजळून टाकण्याचे आवाहन केले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लाचा अभिषेक सोहळा होणे ही केवळ जनकपूरच्या रहिवाशांसाठीच नाही तर संपूर्ण मिथिला क्षेत्रासाठी विशेष आनंदाची बाब आहे. त्यामुळे दिवाळीत जसा उत्सव साजरा केला जातो तसाच उत्सव आताही साजरा व्हायला हवा, असेही दास यांनी म्हटले आहे.