अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला फक्त सहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर यानिमित्ताने आज (16 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिराला भेट देणार आहेत. या मंदिराला रामायणातील महत्त्वाचे स्थान मानले जाते.
आज, पंतप्रधान मोदी लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात प्रार्थना करतील आणि तेलुगूमधील रंगनाथ रामायणातील श्लोक देखील ऐकतील. रामायणापासून या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, सीतेचे अपहरण केल्यानंतर रावणाशी जटायू पक्षाने युद्ध केले होते. त्यावेळी या युद्धात रावण जटायू पक्षाला जखमी करतो आणि तो पक्षी लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिराच्या जागी पडला होता. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील श्री कला राम मंदिराला भेट दिल्यानंतर लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिराला भेट देणार आहेत. तर काही दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पंचवटीला भेट दिली होती.
आज दुपारी 1.30 च्या सुमारास पंतप्रधान वीरभद्र मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. तर दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान श्री सत्य साई जिल्ह्यातील पलासमुद्रम येथे पोहोचतील.
तसेच केरळमधील कोचीमध्ये आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान मोदींचा रोड शोही होणार आहे. आणि पंतप्रधान मोदी 17 जानेवारीला सकाळी केरळमधील गुरुवायूर मंदिरात पूजा आणि दर्शन करतील.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आंध्र प्रदेश दौऱ्यापूर्वी श्री सत्य साई जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पीएम मोदी आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पलासमुद्रम येथे सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थांच्या राष्ट्रीय अकादमीच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील. तर 16 आणि 17 जानेवारीला पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेश आणि केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.