येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच या खास सोहळ्याला राजकीय नेते मंडळींसह, सेलिब्रिटी आणि विदेशी पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. तर दुसरीकडे, आता बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या या खास सोहळ्याच्या प्रसंगी हेमा मालिनी कथ्थकचे सादरीकरण करणार आहेत. हेमा मालिनी या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी तर होणार आहेतच पण सोबत त्या 17 जानेवारी रोजी अयोध्येत कथ्थकचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे सध्या त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
याबाबत हेमा मालिनी यांनी सांगितले आहे की, मी प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आणि दर्शनासाठी पहिल्यांदाच अयोध्येत येत आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येकजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तर आता तो खास क्षण आला आहे, याचे समाधान आहे. तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने माझा एक खास डान्स परफॉर्मन्सही होणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1746383900799352879
14 जानेवारीपासून गुरू पद्मविभुषण तुलसी पीठाधीश्वर जगत गुरू रामानंद स्वामी रामभद्राचार्य यांचा 75 वा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मी आणि माझी टीम 17 जानेवारी रोजी अयोध्येत सायंकाळी सात वाजता रामायणावर आधारित एक नृत्यनाटिका सादर करणार आहे, अशी माहिती हेमा मालिनी यांनी दिली आहे.