मुत्सद्दी, धोरणी, धाडसी, प्रखर बुद्धिमत्ता आणि अजोड पराक्रम, विद्वत्ता, शौर्य, धैर्य आणि साहसाने शत्रूला रणांगणात नेस्तनाबूत करून स्वधर्म आणि स्वराज्यरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६ जानेवारी, १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला.उत्तम साहित्यिक आणि संस्कृत पंडित असणाऱ्या संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘ *बुधभूषण – राजनीती* ’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्यात आपल्या पित्याच्या – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगताना एका श्लोकात ते म्हणतात :
येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैंच्छै: समासादिते |
भूयस्तत्परिपालनाय सकलांजित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: क्रमात् ||
(ज्याने पृथ्वीतलावर विष्णूच्या बौद्धावतारानंतर कलि प्रबळ झालेला असताना मुसलमानांनी सर्व वर्णाश्रमधर्म नष्ट केल्यानंतर पुनः त्याच्या परिपालनासाठी सर्व देवद्वेष्ट्यांना जिंकून विप्रादि वर्णांना आपापल्या वर्णपथावर प्रतिष्ठित केले.)
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे,” ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य…”
युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांच्या अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.
अपरिमित छळ सहन करूनही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला धर्म सोडला नाही. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवा संभाजी जन्माला येईल अशी गर्जना त्या रूद्रशंभूने मरणाच्या दारातही अत्यंत अभिमानाने केली होती. त्या निस्सीम देशभक्ताची, त्यांच्या बलिदानाची स्मृती मनात भवानीच्या पोताप्रमाणे धगधगती ठेवत आपण मार्गस्थ होऊया शिवशंभूंनी दाखवलेल्या मार्गावरून! तीच ठरेल महामृत्युंजयी शंभूराजांना आपली खरी मानवंदना!
सुस्मीता घोगले
प्रीतीलता शाखा ,कात्रज भाग
सौजन्य -समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत