अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी पौष शुक्ल कूर्म द्वादशी विक्रम संवत 2080 या अनुषंगाने भगवान श्री रामलला यांच्या श्री मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा पवित्र योग सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी आला आहे. सर्व शास्त्रानुसार पद्धतींचा अवलंब करून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन मध्य अभिजीत मुहूर्तावर करण्यात येणार असून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
16 जानेवारीला प्रायश्चित्त व कर्म कुटी पूजा, 17 जानेवारीला मूर्तीचा परिसर प्रवेश, 18 जानेवारी रोजी सायंकाळी तीर्थपूजा व जलयात्रा, जलाधिवास व गंधाधिवास, 19 जानेवारीला सकाळी औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास, संध्याकाळी धान्याधिवास, 20 जानेवारी रोजी सकाळी शर्कराधिवास, फलाधिवास व संध्याकाळी पुष्पाधिवास, 21 जानेवारी रोजी सकाळी मध्याधिवास आणि सायंकाळी शय्याधिवास असेल. अशा प्रकारे बारा अधिवास होतील. सर्वसाधारणपणे प्राण-प्रतिष्ठेत सात अधिवास असतात. किमान तीन अधिवास प्रचलित आहेत.
या अनुष्ठानात 121 आचार्य सहभागी होणार आहेत. या अनुष्ठानाचे संयोजक श्रद्धेय गणेश्वर शास्त्री द्राविड आणि मुख्य आचार्य काशीतील श्री. लक्ष्मीकांत दीक्षित हे असतील. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी महाराज आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
श्री रामजन्मभूमी मंदिर प्रांगणात प्राण प्रतिष्ठेचे साक्षीदार होण्यासाठी देशातील सर्व आध्यात्मिक धार्मिक मत, पंथ, संप्रदाय, उपासना पंथांच्या सर्व आखाड्यांचे आचार्य, सर्व परंपरांचे आचार्य, 150 हून अधिक परंपरांचे संत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्री महत, महत, नागा आदींसह 50 हून अधिक आदिवासी, डोंगरी जमाती, किनारपट्टीवासी, द्वीपवासी जनजाती परंपरांची उपस्थिती भारताच्या अलीकडच्या इतिहासात प्रथमच होत असून ही अद्वितीय गोष्ट असेल.
यात सहभागी होणाऱ्या परंपरांमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, पत्य, शीख, बौद्ध, जैन, दशनाम शंकर, रामानंद, रामानुज, निंबार्क, माधव, विष्णु नामी, रामसनेही, घिसा पंथ, गरीबदासी, गौडिया, कबीरपंथी, वाल्मिकी, आसाममधील शंकरदेव, माधवदेव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम संघ, गायत्री परिवार अनुकूलचंद, ठाकूर परंपरा, ओडिशातील महिमा समाज, पंजाबमधील अकाली, निरंकारी, नामधारी राधास्वामी आणि स्वामीनारायण,
वारकरी, वीर शैव इत्यादींचा समावेश आहे. गर्भगृहातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थित अनुक्रमे दर्शन घेतील.
श्री रामलला प्राणप्रतिष्ठेचा उत्साह सर्वत्र अयोध्येसह संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या प्रांतातील जल, माती, सोने, चांदी, रत्ने, कपडे, दागिने, मोठमोठ्या घंटा, पैसा आणि विविध प्रकारचे सुगंध घेऊन लोक सतत येत आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे माती सीतेचे माहेर असलेल्या जानकीपूर आणि सीतामढी येथून भार (मुलीच्या घराच्या बांधकामाच्या वेळेस पाठवलेल्या भेटवस्तू) घेऊन मोठ्या संख्येने लोक आले आहेत. तसेच भगवंतांचे आजोळ असलेल्या रायपूर दंडकारण्य परिसरातून विविध प्रकारचे दागिने समर्पित करण्यात आले आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र भारतातील सर्व बंधू-भगिनींना आवाहन करत आहे, की 22 तारखेला अयोध्येत ज्यावेळी भगवंतांची प्राणप्रतिष्ठा होत असेल, तेव्हा त्यांनी आपल्या आजूबाजूच्या मंदिरांचची सजावट करून मंदिरातील देवतेच्या उपासनेनुसार भजन, पूजा, कीर्ती आणि आरती करावी. स्क्रीन्स लावून प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एकत्रितपणे पाहावा. त्याआधी मंदिरांच्या आजूबाजूची स्वच्छता करण्याचाही प्रयत्न करावा. 22 जानेवारीच्या संध्याकाळी राम ज्योतीने आपले घर उजळून टाकावे.
“22 रोजी सायंकाळी पाच दीपक श्री रामलला यांच्या नावाने जय जय श्री राम.”
श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभ आणि ऐतिहासिक प्रसंगी, सकाळी १० ते बरोबर प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताच्या आधीपर्यंत, सुमारे २ तास श्री रामजन्मभूमी मंदिरात ‘मंगल ध्वनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेत कोणत्याही शुभ कार्याच्या, अनुष्ठानाच्या वा पर्वाच्या निमित्ताने देवतेसमोर आनंद आणि मंगल होण्यासाठी पारंपरिक पद्धतीने शुभ नाद केला जातो. या संदर्भात, प्रभू श्री रामाच्या अभिषेकाचा हा प्रसंग म्हणजे शतकानुशतकांमधून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.
तेव्हा आपण श्री रामलल्लासमोर भारतातील विविध प्रांतांतील आणि राज्यातील पारंपरिक गीते वाजवणार आहोत. या प्रतिष्ठा महोत्सवाची सांगता अयोध्येत विविध राज्यांतील पंचवीस प्रमुख आणि दुर्मिळ वाद्य वादनाने होणार आहे. त्या वाद्यांतील निष्णात कलावंत ते सादर करतील. या राज्यांची नावे व त्यांची मुख्य वाद्ये पुढीलप्रमाणे आहेत
उत्तर प्रदेश-पखवाज, बासरी आणि ढोलक.
कर्नाटक-वीणा
महाराष्ट्र-सुंदरी
पंजाब-अल्गोजा
ओडिशा -मर्दल
मध्य प्रदेश-संतूर
मणिपूर-पुंग
आसाम-नगारा, काली
छत्तीसगड-तब्बोरा
बिहार-पखवाज
दिल्ली-शहनाई
राजस्थान-रावणहट्टा
पश्चिम बंगाल-श्रीखोल, सरोद
आंध्र प्रदेश-घटम
झारखंड- सितार
गुजरात – संतर
तमिळनाडू – नागस्वरम, तविल आणि मृदंगम
उत्तराखंड – हुडका
या शुभ संगीत कार्यक्रमाचे रचनाकार आणि आयोजक यतींद्र मिश्रा हे असून ते प्रसिद्ध लेखक, अयोध्या संस्कृतीचे तज्ञ आणि कलाकार आहेत. त्यांना या कार्यात केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांचे सहकार्य लाभले आहे.
चंपत राय ,सचिव श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे