पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘शीख फॉर जस्टिस’चा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भगवंत मान यांना धमकी दिली आहे. पन्नू याने गुंडांना 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्यासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील गुंडांविरुद्ध झिरो-टॉलरन्सचे धोरण अवलंबले आहे. पंजाबमध्ये गुंडांवर होणाऱ्या कठोर कारवाईचा दहशतवादी पन्नू याला फायदा घ्यायचा आहे. त्यामुळेच त्याने गुंडांना आपल्यासोबत येण्यास सांगितले आहे. पन्नू याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि डीजीपी गौरव यादव यांना 26 जानेवारीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) यावर्षी पन्नूविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता. खलिस्तानी दहशतवादी पन्नू 2019 पासून एनआयएच्या रडारवर आहे. परदेशात राहून पन्नू सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहे अशी माहिती तपास यंत्रणांकडे होती. पंजाबमध्ये फुटीरतावाद वाढल्याचा आरोप त्याच्यावर होता. याशिवाय भारतात वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्यासाठी तरुणांना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर होता.