डीपफेक्स’चा सामना करण्यासाठी येत्या 7 दिवसांत कठोर आयटी नियम अधिसूचित केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज, मंगळवारी याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील बोट निर्मिती युनिटला त्यांनी भेट दिली. तेथील कर्मचारी आणि सहसंस्थापक अमन गुप्ता यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमानंतर डीपफेक संदर्भात राजीव चंद्रशेखर म्हणाले की, सरकारने सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना आधीच स्पष्ट केले आहे की जर ‘डीपफेक्स’ वरील सल्ला पूर्णपणे पाळला गेला नाही तर नवीन आयटी नियम आणले जातील. एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्रपणे बोलताना चंद्रशेखर म्हणाले की, अनुपालनाच्या पातळीवरील दृष्टीकोन संमिश्र आहे. मी यापूर्वी सांगितले होते की शासनाच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन केले जात नसल्याचे आढळल्यास आम्ही या संदर्भात आयटी नियमांमध्ये स्पष्टपणे सुधारणा करू आणि त्यास सूचित करू. सुधारित आयटी नियम आठवडाभरात येण्याची शक्यता आहे. मंत्री म्हणाले की, यासंदर्भातील चर्चेनंतर लक्षात आलेले मुद्दे आता आयटी नियमांमध्ये समाविष्ट केले जातील. हे नवे आयटी नियम पुढील आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.