शिवसेना आमदार अपात्रेतच्या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात काल विधानसभा अध्यक्षांसमोर बंद दाराआड झालेल्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एकूण 5 याचिका दोन गटांमध्ये एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादीची ही सुनावणी 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर पुढील सुनावणीमध्ये साक्षीदार निश्चित केले जाणार आहेत. सोबतच 18 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावणीसाठी राहुल नार्वेकर अधिकचा वेळ मागणार आहेत. नार्वेकरांनी सात दिवसांचा अधिकचा वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे.
31 जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून राहुल नार्वेकरांना देण्यात आले आहेत. त्यामुळे 26 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर सुनावणी पूर्ण करणार असून त्यानंतर ते सुनावणीचा निकाल राखून ठेवणार आहेत. राष्ट्रवादीची सुनावणी ही शिवसेनेपेक्षा वेगळी असल्यामुळे अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.