अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित विधींना कालपासून सुरवात झाली. प्रायश्चित्त पूजेने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली. बहुप्रतीक्षित अश्या ह्या अयोध्येतील नवीन मंदिरात आज प्रभू श्रीरामाचा बालस्वरुप म्हणजे रामलला आज नव्या मंदिर परिसरात विधीपूर्वक प्रवेश करतील यानंतर उद्या रामललाच्या मूर्तीचा गर्भगृहात प्रवेश होईल आणि त्यानंतर पुढील विधी पार पडणार आहेत.
आजच्या कार्यक्रमामध्ये दुपारी 1:20 नंतर जलयात्रा, तीर्थ पूजा, ब्राह्मण-बटूक-कुमारी-सुवासिनी पूजा, वर्धिनी पूजा, कलशयात्रा आणि प्रसाद आवारात भगवान श्री रामलला यांच्या मूर्तीची यात्रा काढली जाणार आहे.
दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरु झाले असून ते अभिषेक समारंभापर्यंत सुरु राहणार आहे. अकरा पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करुन विधी करत असल्याचे राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले आहे .तसेच रामलल्लाचा अंतिम अभिषेक होईपर्यंत सर्व विधी यजमानपद ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा यांच्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारे २२ जानेवारीचे विधी मिश्रा दाम्पत्यांच्या हस्ते होणार आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये असे प्रसिद्ध करण्यात आले आहे की, गर्भगृह प्राण प्रतिष्ठा पूजा मंगळवारपासून सुरु झाली. 16 जानेवारीला साधू संत, विद्वानांनी तपश्चर्या केली आणि सरयू नदीत स्नान केले . विष्णूची पूजा करून पंचगव्य आणि तूप अर्पण करून पंचगव्यप्राशन केले . यानंतर प्रायश्चित्त म्हणून दान केलं. त्यानंतर कर्मकुटी होम करण्यात आला. या कार्यक्रम मोठ्या संपन्न झाला. हवनाच्या वेळी मंडपात वाल्मिकी रामायण आणि भुसुंदीरामायणाचे पठण करण्यात आले होते.