इराणने पाकिस्तानमधील तेहरानला विरोध करणाऱ्या एका दहशतवादी गटाच्या मुख्य स्थानावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इराणने एअरस्ट्राईक करत पाकिस्तानमधील जैश अल-अदलची दोन महत्वाची ठाणी उद्दवस्त केली आहेत. याबाबतचे वृत्त अल अरबिया न्यूजने तस्नीम वृत्तसंस्थेचा हवाला देत दिले आहे.
इराणने हे हल्ले पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी सर्वात मोठ्या ठिकाणावर केल्याचे मीडिया रीपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.अल अरबिया न्यूजच्या रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये इराणने जैश अल अदल या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो इराणच्या दक्षिण भागातील सीस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जैश अल अदलने इराणी फौजांवर अनेकदा हल्ले केले आहेत. अल अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार, डिसेंबरमध्ये जैश अल-अदलने सिस्तान-बलुचिस्तानमधील एका पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्या हल्ल्यात किमान ११ पोलीस कर्मचारी मारले गेले होते.
सीस्तान-बलुचिस्तानची सीमा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला लागून आहे. या प्रदेशामध्ये इराण सुरक्षा दल आणि सुन्नी दहशतवाद्यांमध्ये व ड्रग्स तस्करांमध्ये संघर्ष होत असतो. सिस्तान-बलुचिस्तान हा इराणमधील सर्वात गरीब प्रदेशांपैकी एक आहे आणि या भागातील बहुतांश लोकसंख्या सुन्नी वंशीय बलुची आहे, असे अल अरेबिया न्यूजने म्हटले आहे. तसेच या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशात इस्त्रायली “हेडक्वार्टर” आणि सीरियामधील ISIS-संबंधित कथित लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर एका दिवसानंतर पाकिस्तानमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत.