त्रिशूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायूर येथे भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गुरूवायूरमधील लोक मोठ्या संख्येने आले होते. तर याबाबत पीएम मोदींनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मंदिराच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये लोकांनी मोठ्या संख्येने भाजपचा झेंडा हातात धरल्याचे दिसत आहे.
तर ही पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, “गुरुवायूरमधील लोक मला भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. मला त्यांनी दिलेले प्रेम खूप आवडते आणि यामुळे मला लोकांसाठी आणखी कठोर परिश्रम करण्यास प्रेरणा मिळते.”
पंतप्रधान मोदी आज सकाळी 7.30 वाजता कोचीहून हेलिकॉप्टरने गुरुवायूर येथील श्रीकृष्ण कॉलेज मैदानावर पोहोचले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शेकडो लोकांनी मैदानावर गर्दी केली होती. त्यांनी मंदिरात तूप आणि कमळाची फुले अर्पण करत प्रार्थना केली. गुरुवायुर देवस्वोम हे भगवान गुरुवायुरप्पन यांना समर्पित मंदिर आहे आणि हिंदूंसाठी सर्वात महत्वाचे पूजास्थानांपैकी एक आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी बुधवारी केरळच्या त्रिशूर येथील त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात प्रार्थना केली. पंतप्रधानांची त्रिप्रयार येथील राम स्वामी मंदिराची भेट महत्त्वपूर्ण आहे. कारण त्रिप्रयार मंदिर हे राज्यातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे ज्यामध्ये प्रभू राम हे मुख्य देवता आहेत. प्रभू राम (त्रिप्रयार थेवर) ची प्रतिमा चतुर्भुजा विष्णूच्या रूपासारखी दिसते ज्यात अनुक्रमे शंख (पांचजन्य), एक चक्र (सुदर्शन), धनुष्य (कोदंड) आणि माला आहे. असे मानले जाते की येथे पूजल्या जाणार्या देवतेमध्ये शिवाचे काही पैलू आहेत. असुर, खरा यांचा वध केल्यावरच श्रीरामाला शैव आणि वैष्णव दोन्ही अंगे प्राप्त झाली होती.
केरळच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 4000 कोटी रुपयांच्या तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. हे मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प भारतातील बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या आणि त्यामध्ये क्षमता आणि स्वयंपूर्णता निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी सुसंगत आहेत.
या 3 प्रकल्पांमुळे देशाच्या जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षमतेला, तसेच सहायक उद्योगांसह ऊर्जा पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना मिळणार आहे. तसेच अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.
दोन आठवड्यांच्या कालावधीतील पंतप्रधानांची ही दुसरी केरळ भेट आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात पूजा केली.
या मंदिराचे महत्त्व रामायण काळापासून आहे. असे मानले जाते की रावणाने जखमी केलेला जटायू हा पक्षी सीतेचे अपहरण करत असताना झालेल्या युद्धानंतर येथे पडला होता.