माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि माझी लेक प्रणितीताई शिंदेंना भाजपची ऑफर आली आहे, असा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता भाजपने दिलेल्या ऑफरबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की, भाजपने सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. भेटी होणे ही गोष्ट वेगळी आहे, पण पक्ष म्हणून आम्ही त्यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. तशी आमच्या पक्षाला गरज देखील नाहीये. पण जर कुणी आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्हीही तयार आहोत.
तसेच आम्ही कुणालाही आमदारकी किंवा खासदारकीसाठी पक्षात या असे म्हणणार नाही. मात्र, जर कुणी पंतप्रधान मोदीजींचे नेतृत्व स्वीकारायला येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बोरोट गावामध्ये हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, माझा निवडणुकांमध्ये दोन वेळा पराभव झाला आहे. अशातच आता मला आणि प्रणिती यांना भाजपमध्ये या, अशी ऑफर आली आहे. पण आता ते कसे शक्य आहे? आम्ही ज्या कुशीवर वाढलो, जिथे आमचे बालपण आणि तारूण्य गेले त्याला कसे विसरायचे? मी आता 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी भाजपचे म्हणणे बरोबर आहे असे कसे म्हणणार? तसेच तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की, प्रणिती या पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाहीत.