गेल्या काही काळापासून सातत्याने वधारत असलेल्या शेअर बाजारासाठी आजचा बुधवार हा काळा दिवस ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 1,628 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 460 अंकांची घसरण झाली. गेल्या 16 महिन्यामधील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मात्र 4.5 लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागलेय.
शेअर बाजारात बुधवारी 17 जानेवारी रोजी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. आशियाई बाजारातील कमजोर कल आणि बँक समभागांची जोरदार विक्री यामुळे सकाळपासून शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 1,371.23 अंकांनी घसरून 71,757.54 वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 395.35 अंकांनी घसरून 21,636.95 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचे शेअर्स डिसेंबर तिमाही निकालानंतर 6 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे आज बँकिंग शेअर्स दबावाखाली व्यवहार करताना दिसून आलेत. याशिवाय बाजारातील आजच्या घसरणीमागे अनेक कारणे आहेत.सेन्सेक्स आता 1223 घसरून 71,904.94 वर व्यवहार करत आहे. अॅक्सिस बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि बजाज फायनान्सचे घसरून व्यवहार करत आहेत. दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजारातील या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे इराण आणि पाकिस्तानमधील तणाव असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. दोघांची भूराजकीय परिस्थिती बिघडण्याच्या शक्यतेचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजारावर दबाव वाढला असून घसरण झाली आहे. वास्तविक, इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाचा निषेध केला असून इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आजच 4.5 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
बुधवारी सकाळपासून बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीचे संकेत देत होते. दोघांची सुरुवात प्रत्येकी एक टक्का घसरणीने झाली. दिवसाचा व्यवहार जसजसा वाढत गेला तसतसा बाजारातील तोटा वाढत गेला. व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत, सेन्सेक्स आणि निफ्टीचा तोटा 2.25 टक्क्यांवर पोहोचला होता, जो देशांतर्गत शेअर बाजारातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 73,128.77 अंकांवर होता. आज त्याने 71,998.93 अंकांवर मोठ्या तोट्यासह सुरुवात केली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 1628.01 अंकांनी म्हणजेच 2.23 टक्क्यांनी घसरला आणि 71,500.76 अंकांवर बंद झाला.