या देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोनं पिकवले. अन्नधान्याच्या वस्त्रांच्या समृद्धीकडे नेले. पण जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला. त्यातून काही काळ उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादने ही काळाची गरज आहे. शेतीतील विज्ञान पुन्हा नव्याने मांडण्याची आवश्यकता आहे.
सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव 2024 चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. प्रमुख पाहुणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, तर प्रमुख उपस्थिती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, मदनराव मोहिते व अतुलबाबा भोसले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात पंजाब राज्य शेतीमध्ये प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. पण बेसुमार रसायनांच्या वापरामुळे त्या ठिकाणी शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. क्षारपड जमीन निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा व खतांचा वापर आवश्यक तेवढाच झाला पाहिजे. कृषी क्षेत्रात उदयास येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर केल्यास वेळेत आणि खर्चात बचत होते. कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन, विविध पिकांमध्ये अंतर पिकांचा समावेश, उसतोडणीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, विषमुक्त शेती आणि कृषी उत्पादने या सर्व बाबी शिकण्यासाठी कृष्णा, कृषी व औद्योगिक महोत्सवासारख्या प्रदर्शनांची आवश्यकता आहे. कृषी आणि उद्योग ही दोन्ही क्षेत्रे हातात हात घालून चालतात. तेव्हाच शेतकरी यशस्वी होतो, हे कृष्णा परिवाराने दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, कृषी आणि शेतकरी या दोहोंच्या प्रगतीसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. एक रुपयात शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ आज लाखो शेतकऱ्यांना होत आहे. नमो शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, मागेल त्याला ठिबक सिंचन अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत ते निकाली काढले आहेत. सिंचनाचे महाराष्ट्र आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातले सिंचनाचे प्रकल्प आपण मार्गी लावत आहोत. कृष्णा- कोयनेचे जलसिंचन प्रकल्पही मार्गी लावले आहेत. बंदिस्त जलनलिका पद्धतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या भागात यापुढे कोणत्याही प्रकाराचा दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही, असे सांगून उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलात बचत व्हावी, शेतकऱ्यांना फारशी आर्थिक झळ बसू नये, यासाठी त्या सौर उर्जावर चालविण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शीपणाने जे निर्णय घेतले आहेत त्यांनी साखर उद्योगाला स्थैर्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. यावेळी त्यांनी कराड येथे आधुनिक स्टेडियम लवकरच तयार होईल, अशी ग्वाहीही दिली.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, देशातील 70 टक्के लोकांचे शेतीवर जीवनमान अवलंबून असते, त्यामुळे जोपर्यंत शेतकरी सधन होत नाही, त्यांची उन्नती होत नाही तोपर्यंत सर्वांगीण विकास साधला जात नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी उद्योग आणि सहकार क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी यामध्ये विशेषत: सिंचनासाठी घेतलेले निर्णय वाखाणण्यासारखे आहेत. दुर्लक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात अनेक नवीन योजना अंमलात आणल्या आहेत. ऊस संवर्धन कार्यक्रम कारखाना मोठ्या प्रमाणात राबवितो. कृषी क्षेत्रात आधुनिक नवतंत्रज्ञान आलेले आहे. जमिनीशिवाय शेती, टिशु कल्चर तंत्रज्ञान अशा अनेक नवनवीन बाबी, नवनवीन संशोधन शेतकऱ्यांना समजावे यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. यावेळी त्यांनी जलसिंचनाचे राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागले आहेत. साखर कारखानदारी वाचविण्याचे कामही शासनाने केले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविकात अतुल भोसले म्हणाले, कराड आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आतंरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, जागतिक पातळीवर होणारे संशोधन स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पादन जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, शेतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. दुष्काळ मुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. त्यातूनच भूजल पातळीत वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी कराड येथील क्रीडांगणात रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धा भरविण्यात येतील अशा दर्जाचे ते करावे, अशी विनंती केली आहे.
या कार्यक्रमासाठी शेतकरी, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.