ठाकरे गटाचे आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नगिरीतील निवासस्थानी आज सकाळी एसीबीने धाड टाकली आहे. सकाळपासून एसीबीने राजन साळवींच्या घरी झाडाझडती सुरु केली आहे. दरम्यान एसीबीने आतापर्यंत सहा वेळा राजन साळवी यांची चौकशी केली आहे. तसेच सहाही वेळ साळवी चौकशीला एसीबीच्या अलिबाग कार्यालयात उपस्थित राहिले आहेत. ज्या दिवशी एसीबीने मला पहिली नोटीस धाडली तेव्हाच मला ही मंडळी नक्की एक दिवस माझ्या घरापर्यंत येणार हे मला माहिती असल्याचे साळवी म्हणाले आहेत.
एसीबीच्या धाडीवर बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले, ”अटक, जेल हे मला काही नवीन नाही आहे. मी राजन साळवी काय आहे हे, स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. मला अशी कारवाई होणार अशी अपेक्ष होतीच.”
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. राजन साळवी , त्यांचे बंधू आणि पुतणे हे चौकशीला सामोरे गेले होते. भविष्यात मला कितीही त्रास झाला तरी देखील मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. राजपूरचे आमदार राजन साळवी हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटामध्ये राहिले आहेत. एसीबी चौकशीमुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
साळवी यांच्या मालमत्तेबद्दल एसीबी चौकशी करत आहे. साळवींकडे उत्पन्नापेक्षा ११८ टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये राजन साळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये राजन साळवी, त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.