आज (18 जानेवारी) दावोसमधील जागतिक आर्थिक मंचाच्या प्रसंगी, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी B20 ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेचे आयोजन करताना घेतलेल्या ठरावांप्रती भारताची वचनबद्धता दर्शविण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “व्यावसायिकांच्या नेतृत्वाखालील जागतिक आर्थिक मंच 2024 मध्ये भारताचे योगदान पुढे नेण्यासाठी G20 दरम्यान नवी दिल्लीत संकल्पना असलेल्या ‘B20 ग्लोबल इन्स्टिट्यूट’च्या स्थापनेची औपचारिक घोषणा करताना आनंद होत आहे. B20 ग्लोबल इन्स्टिट्यूट जागतिक मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी, सामाजिक फायद्यासाठी, डिजिटल नवकल्पना आणि AI चा उपयोग करण्यासाठी, ESG तत्त्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि टिकाऊपणा आणि ऊर्जा संक्रमणास समर्थन देण्यासाठी सज्ज आहे.”
https://x.com/smritiirani/status/1747618131915215062?s=20
तसेच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024 मध्ये राज्याने 3,53,675 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवणाऱ्या जागतिक उद्योगांच्या वाढत्या विश्वासाबद्दल एकनाथ शिंदे यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत. तर बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सामंजस्य करारांमुळे राज्यात दोन लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 25 ऑगस्ट 2023 रोजी B20 भारताच्या प्राधान्यक्रम आणि शिफारसी यावरील B20 शिखर परिषदेत बोलताना, B20 इंडियाचे आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले होते की, “आम्ही जागतिक B20 संस्थेची घोषणा करू इच्छितो, ज्याचे उद्दिष्ट प्रवर्तक बनणे आहे. तसेच ही एक भारतातील जागतिक व्यावसायिक संस्था असणार आहे.”