येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन राज्यांचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा 19 जानेवारीला सुरू होईल आणि 21 जानेवारीला संपेल. यावेळी ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.
19 जानेवारीला पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सुमारे 2,000 कोटी रूपयांच्या अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ते पीएमएवाय-अर्बन अंतर्गत पूर्ण झालेली 90,000 हून अधिक घरे सुपूर्द करणार आहेत. सोलापूरमधील रायनगर गृहनिर्माण संस्थेला 15,000 घरे सुपूर्द केली जाणार आहेत. या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, विडी कामगार, चालक आणि इतरांचा समावेश आहे.
तसेच पंतप्रधान मोदी 20 जानेवारीला तमिळनाडूच्या त्रिचीला भेट देणार आहेत. ते श्रीरंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्रिचीमध्ये चार दिवसांसाठी ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे. त्रिचीचे जिल्हाधिकारी प्रदीप कुमार म्हणाले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान ड्रोनसह कोणतीही वस्तू उडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
21 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान मोदी अरिचल मुनई येथे दर्शन आणि पूजा करणार आहेत. तर सकाळी 10.30 वाजता ते कोतंडाराम स्वामी मंदिरात दर्शन व पूजा करतील.