अयोध्या : मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी यांनी विरोधी पक्षांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण करू नये असे आवाहन केले आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराचा सर्व भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे, असे वक्तव्यही हेमा मालिनी यांनी केले आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, “सर्व भारतीयांना राम मंदिराचा अभिमान वाटला पाहिजे. त्याच्याशी जोडणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे विरोधकांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण करू नये. निमंत्रित असतानाही जे प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला येणार नाहीत तर ते त्यांचे नुकसान आहे. तसेच जे येत आहेत त्यांच्यासाठी ते चांगले आहे.”
हा सोहळा भाजप आणि आरएसएस आयोजित असल्याचा आरोप करत अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी 22 जानेवारीच्या मंदिरातील कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हेमा मालिनी यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षात असताना त्यांना काहीही बोलायचे असते. म्हणूनच त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला आहे, असेही हेमा मालिनी म्हणाल्या.
पुढे हेमा मालिनी यांनी सांगितले की “मी पहिल्यांदाच अयोध्येत आले आहे. मी रामायणावर आधारित एका कार्यक्रमात सीतेच्या रूपात सादरीकरण करणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी रामभद्राचार्य यांनी केले आहे. तसेच त्यांनी 10 दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या काळात इथे येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. संपूर्ण बॉलीवूड ‘राममय’ झाले आहे, कलाकार रामावरील गाणी गात आहेत. मी गेल्या वर्षी एक राम भजनही गायले आहे. प्रत्येकजण प्रभू रामासाठी सर्व तयारी करत आहे.”
तसेच हेमा मालिनी यांनी मथुरेतही कृष्णाचे मंदिर झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. मथुरा आणि वृंदावन ही मंदिरे असलेली शहरे आहेत. तेथे बरीच मंदिरे आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी कृष्णाच्या जन्मस्थानी मशीद बांधली गेली. त्यानंतर लोकांनी यावर आक्षेप घेतला होता, तर आता हा मशिदीचा वाद मिटला पाहिजे. आणि मथुरेत कृष्णाचे एक भव्य मंदिर बांधले पाहिजे, असे मत हेमा मालिनी यांनी व्यक्त केले आहे.