राज्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. २० जानेवारीपर्यंत सरकारने आरक्षण न दिल्यास मोठ्या संख्येने मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. मुंबईत तीन कोटींपेक्षा जास्त मराठे आंदोलनासाठी जमणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आंदोलनासाठी त्यांनी शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची मागणी केली आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना मराठा आरक्षासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. आतापर्यंत कुणबी नोंदी सापडलेल्या सर्व मराठ्यांना तात्काळ दाखले देण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यांचे आंदोलन मुंबईत येऊ नये म्हणून राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आज दुपारी ४ वाजता राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळामध्ये आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांचा समावेश आहे.
दरम्यान, कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले देण्याचे आदेश मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वच जिल्ह्यांमध्ये शिबिरे भरवून याचे वाटप करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र वाटपाला गती मिळणार आहे. दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यावर बोलताना म्हणाले, ” ज्या ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना २० जानेवारीच्या आत प्रमाणपत्रे द्या. सगेसोयरे या मुरूडयावर मार्ग काढला हे दाखवा मगच आम्ही पुढचा विचार करू. तुम्ही आता आदेश काढणार आणि चार महिन्यांनी प्रमाणपत्र देणार, हे असे आता चालणार नाही.”