येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. तर त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. यामध्ये आता बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे देखील या खास सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
अनुपम खेर हे 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते उत्सुक असून याबाबतची एक पोस्ट त्यांनी X वर शेअर केली आहे. त्यांनी X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते भगवान रामावरील कविता वाचताना दिसत आहेत.
तसेच त्यांनी हिंदीत एक चिठ्ठीही लिहिली आहे, “जय श्री राम! मी 22 जानेवारीला अयोध्येत माझ्या पूर्वजांचे आणि विशेषतः माझे आजोबा पंडित अमरनाथजींचे प्रतिनिधित्व करीन! या सर्वांचे राम मंदिर स्थापनेचे स्वप्न होते! तसेच श्री रामलल्ला यांचे अयोध्येतील पुनरागमन हा आत्मविश्वास जागृत करतो की, ज्याने त्यांची एखादी अवधपुरी कुठेतरी सोडली असेल, त्याला एक दिवस ती नक्कीच सापडेल. या ऐतिहासिक सोहळ्यात मला सहभागी होण्याची संधी मिळाली हा श्री रामाचा आशीर्वाद आहे. हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी मला मिळाली. मी तुमच्या सर्वांसाठीही प्रार्थना करेन”, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/AnupamPKher/status/1747820070221541576
अनुपम खेर यांच्यासह अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणदीप हुडा, अनुष्का शर्मा आणि तिचा पती, स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना मिळाले आहे.
अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या आठवडाभर आधी म्हणजेच मंगळवारी सुरू झाले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी ‘दर्शना’साठी खुले होणार आहे.
“‘प्राण प्रतिष्ठा’ची सांगता दुपारी 1 वाजेपर्यंत होणे अपेक्षित आहे. समारंभानंतर पंतप्रधान मोदी आणि इतर उपस्थित आपले मनोगत व्यक्त करतील. परंपरेनुसार नेपाळच्या जनकपूर आणि मिथिला भागातून 1000 टोपल्यांमध्ये भेटवस्तू आल्या आहेत”, असेही चंपत राय यांनी सांगितले.