पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. या सोहळ्यादरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामाची मूर्ती विराजमान होणार आहे. तसेच मंगळवारपासून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली असून ती सात दिवस चालणार आहे. या सोहळ्यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून हजारो व्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रणे मिळाली आहेत. त्यामुळे या सोहळ्याचा भाग होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत पोहोचले आहेत.
रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात रामायण पठण आणि रामलीला देखील सादर केली जाणार आहे. यासाठी अभिनेते राकेश बेदी आणि विंदू दारा सिंह अयोध्येत पोहोचले आहेत. विंदू दारा सिंह हा दिवंगत अभिनेते दारा सिंह यांचा मुलगा आहे, ज्यांनी रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये हनुमानाची भूमिका साकारली होती.
राकेश बेदी आणि विंदू दारा सिंह हे अयोध्येत पोहोचताच त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना रामलीलामध्ये परफॉर्म करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. हा कार्यक्रम 16 ते 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमात विंदू सिंह भगवान शिवाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
माध्यमांशी बोलताना विंदू म्हणाले की, मला 16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अयोध्येत ‘रामलीला’ करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मी भगवान शिवाची भूमिका साकारत आहे. तसेच अयोध्या हे जगातील सर्वोच्च तीर्थक्षेत्र बनणार आहे. कलियुगातही सत्ययुग येत आहे, असे म्हणतात ते खरे आहे.
आमचे राम मोदीजी आणि योगीजी खूप काम करत आहेत आणि देशाची सेवा करत आहेत. अयोध्येत येऊन खूप छान वाटत आहे. तसेट मोदीजी आणि योगीजींनी तर काम केलेलेच आहे, पण बाकी लोकांनीही किती छान काम केले आहे. त्यामुळे आता अयोध्या हे सर्वोच्च धार्मिक स्थळ बनणार आहे”, असेही विंदू यांनी म्हटले आहे.