देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला म्हणजे उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार दहा वाजून ४५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात येतील. सोलापुरातल्या कुंभारी येथे साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.सोलापूर शहराजवळ कुंभारी येथे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने साकार होणाऱ्या ३० हजार असंघटित कामगारांना रे नगर योजनेतून पक्की घरे दिली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून रे नगर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी हे सुमारे एक लाख जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. यासह महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या एकूण ९० हजार घरांचे लोकार्पण देखील याच कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. शिवाय मालेगाव, भिवंडी, सांगली, शेगाव, उल्हासनगर, सातारा, कल्याण डोंबिवली, चंद्रपूर या आठ शहर आणि जिल्ह्यात अमृत योजनेद्वारे सुमारे १७०० कोटी रुपयांचे प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापुरातल्या या कार्यक्रमातून केली जाईल. तसेच महाराष्ट्रातील दहा हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वाटप ही करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष हेलिपॅडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल यांच्यासाठी सुद्धा हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.