दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स बजावले होते. चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, दोन महिने आधी मला का नोटीस पाठवण्यात आली असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी ईडीला विचारले आहे. याआधी केजरीवाल यांना तीन समन्स बजावण्यात आले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या नोटिसी बेकायदेशीर असल्याचे सांगत चौकशीला जाणे टाळले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांना आलेल्या चौथ्या समन्सवर बोलताना केजरीवाल म्हणाले, ”हे बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने अवैध आहे. जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या नोटीस बजावण्यात आल्या तेव्हा त्या कोर्टाने रद्द केल्या आहेत. मी ईडीला अनेकदा पत्र लिहिले आहे. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. हे एक राजकीय षडयंत्र आहे. ही चौकशी दोन दिवसांपासून सुरु आहे, मात्र त्यांना काही सापडले नाही.”
”या प्रकरणात काही वसुली झाली आहे का असे कोर्टाने त्यांना अनेकदा विचारले आहे. किती पैसे मिळाले आहेत. लोकांना मारहाण केली जात आणि खोटी साक्ष घेतली जात आहे. निवडणुकीच्या आधी २ महिने मला नोटीस का पाठवली गेली. कारण मी लोकसभेचा प्रचार करू नये अशी काही जणांची इच्छा आहे. निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना रोखणे हाच यांचा उद्देश आहे.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत २ नोव्हेंबर, २२ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटीस बेकायदेशीर असल्याचे सांगत केजरीवाल चौकशी गैरहजर राहीले होते.