पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी पंढरपूरचा विठ्ठल आणि सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज यांना नमस्कार देखील केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले.
दरम्यान, सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, ”पंढरपूरचा विठ्ठल आणि सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज यांना मी नमस्कार करतो. ही वेळ भक्तीभावाने भरलेली आहे.” त्यांनी नुसते २२ जानेवारी एवढे म्हणताच सभेला उपस्थित लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. काली काळाने घोषणा थांबल्यानंतर मोदींनी आपले भाषण पुन्हा सुरु केले. २२ जानेवारीला आपले प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत असे मोदी म्हणाले.
दरम्यान, त्याआधी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुस्तीसुमने उधळली. ”आज मोदींमुळे करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अबूधाबीमध्ये देखील मंदिर तयार होत आहे, त्याचे उदघाटन मोदी करणारेत. मी दावोसला जाऊन आलोय. तिथे असणाऱ्या अधिकारी, मंत्री आणि उद्योजकांमध्ये मोदींचेच नाव होते. मोदी सरकार पुन्हा देशात सरकार स्थापन करणार याची गॅरंटी आहे. राज्यात देखील आमचे सरकार स्थापन होईल.” या कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.