अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला फक्त 3 दिवस राहिले आहेत, त्यामुळे संपूर्ण जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी आज होणाऱ्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात देवतेच्या आत्म्याचे आणि भावनांचे मूर्तीमध्ये विधीवत हस्तांतरण होईल, अशी माहिती दिली आहे.
प्राणप्रतिष्ठेपूर्वी गुरुवारी रामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली. तसेच गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या वस्त्राने झाकलेल्या या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. विश्व हिंदू परिषदेचे मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी हे फोटो शेअर केले होते. तसेच वैदिक ब्राह्मण आणि मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज श्री राम मंदिराच्या पवित्र परिसरात पूजा समारंभाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
‘प्राण प्रतिष्ठा’चे महत्त्व सांगताना मुख्य पुजारी म्हणाले की, “ज्या प्रभू रामाची आपण उपासना करतो त्यांची उर्जा आपल्या कल्याणासाठी मदत करते आणि आपले शरीर आणि मन नेहमी निरोगी ठेवते, ती उर्जा मूर्तीमध्ये हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे श्री रामलल्लाच्या या मूर्तीची पूजा केल्याने आपल्याला चांगले आरोग्य आणि आनंदाची बातमी मिळेल.
तसेच संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडण्यासाठी किती दिवस लागतात, यावर मुख्य पुजारी म्हणाले, “प्राण प्रतिष्ठा सोहळा 17 जानेवारीला सुरू झाला आणि 22 तारखेला संपेल. या सोहळ्यासाठी कधी कधी सात दिवस लागतात, तर इतर वेळी 11 किंवा 23 दिवसांपर्यंत हा सोहळा चालतो.
पुजाऱ्यांनी पुढे सांगितले की, ‘प्राण प्रतिष्ठा’ची सुरुवात कलश यात्रेने होते. या यात्रेनंतर मूर्तीचे ‘नगरभ्रमण’ (शहराभोवती फेरफटका) झाले आणि त्यानंतर शरयू नदीत स्नान करण्यात आले. या समारंभाच्या सर्व विधींमध्ये शरयू नदीतील पाणी वापरण्यात आले आहे. तसेच हे विधी सहा दिवस चालतील.
‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभाच्या शेवटच्या दिवसाच्या विधींबद्दल माहिती देताना मुख्य पुजारी म्हणाले की, “22 जानेवारी रोजी, मूर्तीला जलदिवास, दुग्धदिवास, पुष्पविवास, औषधीवास आणि अन्नादिवासाचे विधी स्नानापूर्वी दिले जातील.नंतर ही प्राण प्रतिष्ठा वैदिक श्लोकांच्या पठणातून केली जाईल.
“प्राण प्रतिष्ठेनंतर, मूर्तीने देवतेच्या सर्व शक्ती आत्मसात केल्यावर, तिला तिच्या जागी गर्भगृहात ठेवले जाईल. त्यानंतर मूर्तीसमोर आरसा लावला जाईल आणि डोळ्यात काजळ लावले जाईल. हा प्राणप्रतिष्ठेचा अंतिम टप्पा असून त्यानंतर भक्तांना मूर्तीचे दर्शन घेता येईल, असेही पुजाऱ्यांनी सांगितले.