उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रावरसुद्धा होताना दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वातावरण कोरडे झाले असून उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात किमान तापमानात घट दिसून येत आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून पुढील दोन दिवस ही थंडी कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याकडून आता देण्यात आला आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असून, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज समोर येत आहे.
तसेच निफाड आणि धुळ्यामध्ये थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवणार असून, उर्वरित राज्यातही किमान तापमान १० ते १८ अंशांच्या घरात राहणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि कोकण पट्ट्यामध्येही पहाटेच्या वेळी धुके आणि थंडीचा कडाका जाणवणार आहे.
पुण्यातही तापमान नऊ अंशापर्यंत गेले आहे . तसेच देशभरातच सध्या थंडी आणि धुक्याची चादर दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, काश्मिरचे खोरे, उत्तराखंड या राज्यांमध्ये किमान तापमानात घट कायम असून काही ठिकाणी त्यात किंचित वाढ दिसून येत आहे. तर झारखंड, चंदीगढ, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा या राज्यांमध्ये धुक्याची चादर कायम राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.