बहुप्रतीक्षित ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा जवळ येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांच्या ‘अनुष्ठान’ आणि देशभरातील प्रभू रामाच्या प्रमुख मंदिरांच्या यात्रेला सुरुवात केली आहे. तर आज पंतप्रधान मोदी हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदा भगवान श्री रामलल्ला यांच्या आगामी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल बोलताना म्हणाले की, हा सर्वांसाठी भक्तीचा काळ आहे.
“मी आता काही संतांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या ‘यम नियमात’ व्यग्र आहे आणि रामलल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठे’पूर्वी मी त्यांचे काटेकोरपणे पालन करत आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटीच्या भूमीतून माझ्या विधीची सुरुवात झाली हा देखील योगायोग आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीने भरलेली आहे. तो ऐतिहासिक क्षण 22 जानेवारी रोजी येणार आहे, जेव्हा प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.”
प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या अगोदर 11 दिवसांच्या अनुष्ठान दरम्यान, पंतप्रधान मोदी जमिनीवर झोपणे, फक्त नारळपाणी सेवन करणे, गौ-पूजा (गाईपूजा) करणे, अन्नदान आणि कपडे दान असे करणे यासह पवित्र ग्रंथांनी सांगितलेल्या पद्धतींचे काटेकोरपणे पालन करत आहेत.
पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसांत नाशिकमधील रामकुंड आणि श्री काळाराम मंदिर, लेपाक्षी, पुट्टापर्थी, आंध्र प्रदेशमधील वीरभद्र मंदिर आणि केरळमधील गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरासह विविध प्रदेशातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. तर त्यांच्या आगामी भेटींमध्ये पुढील दोन दिवसांत तामिळनाडूतील आणखी मंदिरांचा समावेश असणार आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी 12 जानेवारी रोजी नाशिकमधील श्री काळाराम मंदिराचा मंदिर परिसर स्वच्छ करण्यात सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छ तीर्थ उपक्रम सुरू केला.
त्यांच्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील लोक #स्वच्छतीर्थ मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. यामध्ये सेलिब्रेटींपासूनते सामान्य माणसांपर्यंत स्वेच्छेने पंतप्रधानांच्या अनुषंगाने या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.