मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून त्यांचा पायी मोर्चा निघणार आहे. तसेच 26 तारखेपासून मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना आवाहन केले आहे.
मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे कोट्यावधी लोक मुंबईत दाखल होतील, अशी भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना आंदोलन करणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी आम्ही अधिवेशन घेऊन कायदा करणार आहोत. ओबीसी समाज आणि इतर समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत, हा शब्द आम्ही दिलेला आहे. मराठा आरक्षणाबाबतीत सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा मनोज जरांगेंनी सकारात्मक आणि सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
तर याबाबत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही सामंजस्याची भूमिका किती दिवस घ्यायची. सात महिने आम्ही दिले होते तुम्हाला. त्यामुळे आम्ही अजून किती वेळ द्यायचा. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मानसन्मान ठेवला आहे. त्यामुळे आता आम्ही मुंबईला जाणार आहोत, अशी भूमिका जरांगेंनी स्पष्ट केली आहे.