सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारण मविआच्या दोन नेत्यांना ईडीने नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 24 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावले आहे.
रोहित पवारांना बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये ईडीने समन्स बजावले आहे. बारामती अॅग्रो कारखान्याचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये काय संबंध होता, याबाबत रोहित पवारांची चौकशी करण्यात येणार आहे.
तर किशोरी पेडणेकर यांना कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांना येत्या गुरूवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ईडीने बारामती अॅग्रो कारखान्याशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये बारामती अॅग्रोच्या पुणे, बारामती येथील कार्यालयांचा समावेश होता. त्यावेळी ईडीकडून कागदपत्रांची छाननी देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने रोहित पवारांना थेट नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता त्यांना येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.