देशाचे संरक्षण मंत्री सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह हे उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील असणाऱ्या जोशीमठ येथे योजित एका कार्यक्रमात बोलत होते. ‘नैसर्गिक आपत्ती’ आणि ‘शत्रू देशा’चा सहभाग निश्चित करण्यासाठी अभ्यास करण्याचे आवाहन केले.तसेच राजनाथ सिंह यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने सात राज्यांमध्ये बांधलेल्या ३५ पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उदघाटन देखील केले.
आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या काही सीमावर्ती राज्यांमध्ये अलीकडील काळामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या संख्येचे वाढ झालेली दिसून येत आहे. हिमालय पर्वत हा अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात होण्याच्या घटना काही राज्यांपुरत्याच मर्यादित आहेत. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती येत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे असे राजनाथ सिंह म्हणाले.
बदलत्या हवामानावर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ”देशातील हवामान बदल हे केवळ हवामानाशी संबंधित नसून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. संरक्षण मंत्रालया (MOD)ने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे.” राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडच्या सीमावर्ती जिल्ह्यातून होणाऱ्या स्थलांतरावरही चिंता व्यक्त केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पुषकरसिंह धामी पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित सर्व योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचे सिंह या कार्यक्रमात म्हणाले.