मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. त्यांनी अंतरवली सराटीमधून आपल्या लढ्याला सुरुवात केली आहे. मात्र जरांगे पाटील यांनी आता सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवस आधी जाहीर केल्याप्रमाणे आज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहेत. आज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी जरांगे पाटील म्हणाले, ”आज आम्ही मुंबईला तर जाणारच. मुंबईला गेल्याशिवाय गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना न्याय कसा मिळणार? आता ही शेवटची आणि आरपारची लढाई आहे. लढणार आणि आरक्षण मिळवणारच. आरक्षण मिळवल्याशिवाय आता माघार घेणार नाही. जनतेचे पालकत्व सरकारकडे आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. ही लढाई आता आम्ही जिंकणारे. मुंबईच्या गल्ली-गल्लीमध्ये २६ तारखेला मोठ्या संख्येने मराठे तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच.”
दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच ५४ लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे भरवून या प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.