येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. यानिमित्त सर्वत्र जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच काही जणांनी हे निमंत्रण स्वीकारले नाहीये. म्हणजे काँग्रेस, प्रकाश आंबेडकर तसेच अन्य काही पक्षांनी व नेत्यांनी आणि मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आप पक्षाचा खासदार हरभजन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पूर्व क्रिकेटर आणि खासदार हरभजन सिंग यांना रॅम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अनेक विरोधी पक्षांनी, नेत्यांनी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. हरभजन सिंग ANI शी बोलताना म्हणाले, ”काही फरक पडत नाही की, या सोहळ्यामध्ये कोण येणार आहे , कोण नाही. काँग्रेस आणि इतर पक्षांनी जायचे कि नाही ते त्यांनी ठरवावे. मी मात्र या सोहळ्याला जाणार आहे. एक व्यक्ती म्हणून माझी ही भूमिका आहे. जर का माझ्या जाण्याने कोणाला अडचण असेल तर त्यांनी काय हवे ते करावे.” हरभजन सिंग पुढे बोलताना म्हणाले, ”हे आपले सौभाग्य आहे की हे मंदिर बनले आहे. आपल्याला सर्वाना अयोध्येला जायला हवे आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घ्यायला हवा. मी नक्कीच श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. ”
भाजपा राम मंदिराच्या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी या सोहळ्यांना येणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हा कार्यक्रम प्रचाराचा प्रमुख मुद्दा करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला येणार नसल्याचे सांगितल्यानंतर हरभजन सिंग यांची ही प्रतिक्रिया अली आहे.