झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात आज ईडीचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान ईडीचे अधिकारी चौकशीसाठी येणार असल्याने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निवासस्थान आणि महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
रांचीचे पोलीस अधीक्षक राजकुमार मेहता म्हणाले, ”रांचीच्या अनेक भागांमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कोणीही कायदा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. अनेक विविध ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. सुरक्षेचे सर्व मापदंड लक्षात घेतले आहेत.” दरम्यान, मुख्यमंत्री सोरेन यांची ईडी चौकशी करणार या विरोधात झारखंड मुक्ती मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाजवळ ईडी चौकशीविरुद्ध निदर्शने केली.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते की, ते २० जानेवारी रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी येऊन जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवू शकते. ईडीने मुख्यमंत्री सोरेन यांना आठवे समन्स पाठवत १६ ते २० जानेवारीच्या मध्ये चौकशीसाठी सहकार्य करण्यासाठी सांगितले होते. ईडीने यापूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे जवळचे असणारे अभिषेक प्रसाद यांना बेकायदेशीर खाण प्रकरणाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग चौकशीत समन्स बजावले होते.
ईडीने मुख्यमंत्री सोरेन यांना काही दिवसांपूर्वी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांचे म्हणणे मांडण्याची शेवटची संधी दिली होती. सोरेन यांनी हे समन्स बेकायदेशीर आहे असे ईडीला कळवले होते. ”तुम्हाला जारी करण्यात आलेल्या समन्सचे पालन करत तुम्ही ईडी कार्यालयात आले नसल्याने, आम्ही तुम्हाला या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ , कलाम ५० अंतर्गत तुमचे म्हणणे मांडण्याची शेवटची संधी देत आहोत. ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत तुम्ही तुमचा जबाब ईडीकडे द्यावा असे, ” ईडीने बजावलेल्या समन्समध्ये म्हटले आहे.