मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला २० जानेवारी पर्यंतची मुदत दिली होती. २० तारखेपर्यंत आरक्षण न दिल्यास मोठ्या संख्येने मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता. त्यानुसार आरक्षण न मिळाल्यामुळे जरांगे पाटील त्यांच्या अंतरवली सराटी यावं गावावरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. २६ जानेवारी रोजी मुंबईत सर्वत्र मराठेच मराठे दिसतील असे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागांमधून मराठा बांधव पायी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्याने आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न देखील सुरु आहेत.
२६ तारखेला मुंबईत तीन कोटींपेक्षा जास्त मराठा दिसतील असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर राज्य सरकार वेगाने काम करताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्ष बंगल्यावर अत्यंत महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून जाणून घेणार आहेत. त्यानंतर कदाचित मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
तसेच सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच ५४ लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे भरवून या प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.