अयोध्येत आज पाचव्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून श्री राम मंदिरात अभिषेक विधी सुरू आहे. आजचा पूजाविधी सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. १६ जानेवारी रोजी दुपारी शरयू नदीतून प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला होता तर १७ जानेवारी रोजी श्री रामलल्लाच्या मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन झाले होते
आज मुख्यतः श्री रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये वास्तुपूजा सुरू आहे. या पूजेमध्ये अनिल मिश्रा त्यांच्या कुटुंबासह आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक जी आणि इतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वतीने पूजा करत आहेत.
आज रामलल्ला त्यांच्या तात्पुरत्या मंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करतील. रामलल्ला जवळपास पाचशे वर्षांनी आपल्या मंदिरात परतत आहेत.
आज श्री रामललाची मूर्ती प्रथम साखरअधिवासात आणि फल अधिवासात ठेवण्यात आली होती. यानंतर 81 कलशांमध्ये जमा झालेल्या विविध पवित्र पाण्याने स्नान करण्यात आले. त्यानंतर आज मुर्ती पुष्पाधिवासात ठेवून अधिवासाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
22 जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यासाठी गर्भगृहाची सजावट करण्यात येत आहे. मंदिराचा प्रत्येक कोपरा अनेक क्विंटल फुलांनी सजलेला आहे.आज ८१ कलशांमध्ये भरलेल्या विविध नद्यांच्या पाण्याने गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. या सगळ्यात मंदिराला फुलांनी सजवले जात असतानाच दिव्यांचीही सजावट करण्यात आली आहे.