22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अखेर उद्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येत येण्याचे वेळापत्रक ठरले आहे. पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 11 वाजता श्री रामजन्मभूमीवर पोहोचतील. तसेच दुपारी 12:05 ते 12:55 या वेळेत ते अभिषेक सोहळ्यात सहभागी होतील.
रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दुपारी 12.20 ते 1 वाजेपर्यंत चालणार आहे. तसेच रामलल्लाच्या डोळ्याची पट्टी पंतप्रधानांच्या उपस्थितीतच काढली जाणार आहे. यानंतर पीएम मोदी सोन्याच्या काडीने रामलल्लाला काजळ लावणार आहेत आणि आरशात ते रामलल्लाला दाखवतील.
तसेच कर्नाटकातील बेंगळुरू येथील रहिवासी मंजुनाथ शर्मा यांनी पाकिस्तानच्या तीन पवित्र नद्यांचे पाणी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे सुपूर्द केले आहे. मंजुनाथ हे जय शारदा समितीचे सदस्य आहेत. 22 जानेवारीला पाकिस्तानच्या तीन पवित्र नद्यांच्या पाण्याने अयोध्येत प्रभू रामाचा जलाभिषेक केला जाणार आहे. शनिवारी पाकव्याप्त काश्मीरमधून तीन नद्यांचे पाणी अयोध्येत आणण्यात आले आहे.
दरम्यान, 13 VVIP पाहुणे अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आहेत. यामध्ये टाटा-बिर्ला, रिलायन्स ग्रुपचे अंबानी कुटुंब, अग्रवाल ग्रुपचे अध्यक्ष, दालमिया ग्रुप, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.