20 जानेवारी रोजी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. यादरम्यान, आता सानिया मिर्झाच्या बहिणीने एक निवेदन जारी केले आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला होता, असे निवेदन त्यांनी जारी केले आहे.
सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाने ‘मिर्झा कुटुंब आणि टीम सानिया’च्या वतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सानिया मिर्झाच्या चाहत्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी तिच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर करावा.
सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाने एक पोस्ट केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, ‘सानियाने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक व्यासपीठांपासून वेगळे ठेवले आहे. पण आता असा प्रसंग आला आहे की सर्व काही सांगावे लागेल. आम्हाला सांगायचे आहे की शोएब आणि सानियाचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. आता सानियाने शोएबला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनम मिर्झाच्या निवेदनात पुढे लिहिले आहे की, सानियाच्या आयुष्यातील या भावनिक क्षणात आम्ही सानियासोबत आहोत. आम्ही सर्व चाहत्यांना आणि प्रियजनांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये आणि गोपनीयतेचा आदर राखावा.
तर 20 जानेवारीला टेनिसपटू सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी शोएब मलिकच्या लग्नावर मोठे वक्तव्य केले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले होते, “हे एक ‘खुले’ सत्य होते.”
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा विवाह 12 एप्रिल 2010 रोजी पारंपारिक पद्धतीने झाला होता. हे लग्न हैदराबादमध्ये पार पडले होते. तर लग्नानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 2018 मध्ये सानिया मिर्झाने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव इझान आहे.