अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात उद्या दुपारी श्रीरामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होत आहे. यासाठी देशविदेशातून अनेक मान्यवर अयोध्येत दाखल झाले आहेत. या संपूर्ण आंदोलनात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील आज अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते गाभाऱ्यात उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक अन्य विशेष निमंत्रितही या सोहळ्यात उपस्थित होण्यासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. संपूर्ण अयोध्या नगरी उद्याच्या सोहळ्यासाठी सजली आहे. देशभरात देखील विविध ठिकाणी शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये लोक स्वयंस्फूर्तीने जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आज महापूजा, रामपूजन, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.