राम वन गमन पथामुळे विचलित झाले नक्षलवादी
नागपूर, २१1 जानेवारी : अयोध्येच्या राम मंदिरात आयोजित श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात नक्षलवाद्यांकडून सोहळ्याला विरोध करणारी पत्रके पुढे आली आहेत. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा प्रवक्ता अभय याने पत्रक जारी करून राम मंदिरातील प्रस्तावित सोहळ्याला विरोध केलाय. तसेच दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने राम मंदिर सोहळ्यावर बहिष्काराचे आवाहन केलेय.
नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने २१ जानेवारी २०२४ रोजी एक पत्रक जारी करून राम मंदिरातील सोहळ्याला विरोध केलाय. अयोध्येतील धार्मिक आयोजनाचा केंद्र सरकारला निवडणुकीत लाभ होईल. तसेच हा संघ परिवार आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचा आरोप करत नक्षलवाद्यांनी कार्यक्रमाचा विरोध केलाय. यासोबतच दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने अतिशय जहाल भाषेत भगवान राम आणि अयोध्येतील राम मंदिरात आयोजित सोहळ्याचा विरोध केलाय. भगवान रामांचे राज्य आदर्शन नव्हते, श्रीराम आदिवासी आणि महिला विरोधी होते अशा भाषेत देव आणि धर्माचा अपमान केलाय. तसेच राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे सर्वांनी बहिष्कार करावे असा इशाराच दिला आहे.
नक्षलवाद्यांकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकांमागे ‘राम वनगमन पथ’ ही खरी अडचण असल्याची माहिती पुढे आलीय. वनवासाच्या काळात ज्या ज्या भागातून श्रीराम गेले होते. त्या परिसरात २ हजार २६० किलोमीटर लांबीचा “राम वन गमन पथ” निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत हा कॅरिडोअर असणार आहे. ज्या भागात प्रभू श्रीराम थांबले होते त्या परिसराचा विकास या योजनेत केला जाणार. “राम वन गमन पथ” मार्गाचा मोठा भाग छत्तीसगडच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत गेलेला आहे. याच मार्गावर नक्षलवाद्यांचा प्रभावक्षेत्र असलेले सुकमा, नारायणपूर, बिजापूर, जगदलपूर, बस्तर हे जिल्हे आहे. एकूणच ‘राम वन गमन पथ’ नक्षलवाद्यांना त्यांच्या प्रभावक्षेत्रात विकासाच्या नव्या योजना आणणारा मार्ग बनेल आणि त्यांचा प्रभाव कमी होईल अशी भीती वाटते आहे.नक्षलवाद्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात राम वन गमन पथ नको आहे.. याच भागात नक्षलवाद्यांची सर्वात उत्कृष्ट गोरिल्ला आर्मी “कंपनी वन” तैनात आहे. त्यामुळेच नक्षलवादी प्रपोगंडाच्या माध्यमातून “राम वन गमन पथ” आणि श्रीरामाला बदनाम करत आहेत.