लासलगाव, २१ जानेवारी- एका गोमातेची सेवा करणे हे ५ मंदिरे बांधण्यासमान आहे. पशुधन हे अध्यात्माचा प्राण आहे, प्रत्येक गावामध्ये गोशाळा उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असून राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधानांनी गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, अशी मागणी जैन मुनी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी केले.
८० हजार किलोमीटरचा पायी प्रवास करून भारतभ्रमण सुरू असताना लासलगाव येथे राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांचे नाशिक येथे जात असताना लासलगावी परमपूज्य भगरी बाबा मंदिर येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रभू श्रीराम हे कोणत्याच जातीचे नव्हते, अनेकांनी राम मंदिराला विरोध केला, मात्र तो केवळ स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी होता. आज प्रत्येकाने प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यावे, त्यांची विचारधारा समजून घ्यावी व त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवर चालावे, जोपर्यंत धरती आहे तोपर्यंत रामनाम निश्चित असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. प्रभू रामाच्या अस्तित्वाला नकार देणे म्हणजे आपल्या पूर्वजनांचा अपमान करणे हे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण वाचवायचे असेल तर पशुधन वाचविण्याची गरज आहे पशुधन हे अध्यात्माचा प्राण असून प्रत्येक गावागावात गोशाळा निर्मिती होणे गरजेचे आहे त्यासाठी राज्य सरकारने मोठी मदत करावी ज्याप्रमाणे कुक्कुटपालन व विविध व्यवसायासाठी अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे गोशाळा बांधण्यासाठी नुसती परवानगी न देता त्यासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.