अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. 22 जानेवारी रोजी प्रभू रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दरम्यान, या सोहळ्यावर सायबर हल्ल्याचा धोकाही निर्माण झाला आहे. उद्या होणारा हा खास सोहळा जगभरातील लाखो लोकांना लाइव्ह पाहता येणार आहे. पण या थेट प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबतचा इशारा देण्यात आला आहे.
या सायबर हल्ल्याबाबत मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. तीन दिवस वेबसाइटवर कोणतेही बदल केले जाणार नाहीत. सरकारी वेबसाइट्स आणि पोर्टल्सच्या सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांना सायबर हल्ल्यांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या लाइव्ह प्रक्षेपणावरील सायबर हल्ल्यांबाबत सरकारने विभागीय संकेतस्थळांना पत्र जारी केले आहे. सरकारच्या डेटाशी भारत आणि परदेशातील हॅकर्स छेडछाड करून सायबर हल्ले करू शकतात, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच मुख्य सचिव मिश्रा यांनी विभागाशी संबंधित सर्व वेबसाइट, पोर्टल आणि विभागीय डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.