अयोध्येत उद्या (22 जानेवारी) रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर हा खास सोहळा पाहण्यासाठी जगभरातील रामभक्त उत्सुक झाले आहेत. एकिकडे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने 22 जानेवारी रोजी सर्व सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीबाबतचा प्रस्ताव अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे एलजी विनय सक्सेना यांना पाठवला होता. तसेच सक्सेना यांनी शनिवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
सोबतच या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. यावेळी संपूर्ण शहरात मोठी शोभायात्रा निघणार आहे. तसेच आयोजित केलेल्या या भंडाऱ्यात आणि शोभायात्रेमध्ये आप पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, 20 जानेवारीपासून आप सरकारने दिल्लीमध्ये तीन दिवसांचे भव्य रामलीलाचे आयोजन केले आहे. दिल्लीतील आयटीओजवळील प्यारेलाल ऑडिटोरियम येथे ही रामलीला संपन्न होत आहे. तर या सोहळ्यासाठी आज स्वतः अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.