अयोध्या : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आज (22 जानेवारी) सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने आज रामराज्य सुरू होईल आणि सर्व विषमता संपुष्टात येईल.
“आजपासून रामराज्याची सुरुवात प्राणप्रतिष्ठेने होणार आहे. त्यामुळे सर्व विषमता संपुष्टात येईल. तसेच प्रत्येकजण प्रेमाने वागेल. अयोध्येतून संपूर्ण देशात जो बदल घडेल तो खूप सुंदर असेल. आणि सर्वजण एकोप्याने राहतील. प्रभू रामाचा आशीर्वाद सर्वांवर असेल,” असे आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “सगळे छान चालले आहे. रामभक्तांना जे हवे होते ते आज पूर्ण होत आहे.तसेच रामलल्लांमुळे सर्व अडचणी दूर होतील.”
दरम्यान, रामलल्लाची ‘प्राण प्रतिष्ठा’ पौष शुक्ल कूर्म द्वादशी, विक्रम संवत 2080 ला नियोजित आहे, जी आज 22 जानेवारी पार पडणार आहे. आज या सोहळ्याची सुरुवात सकाळच्या पूजेने होईल आणि त्यानंतर ‘मृगशिरा नक्षत्र’ मध्ये राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेने होईल, जो दुपारी 12.30 च्या सुमारास सुरू होऊन दुपारी 1 वाजता संपेल.
या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा दिनी रामजन्मभूमी मंदिरात आरतीच्या वेळी अयोध्येवर लष्कराचे हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करतील आणि 30 कलाकार मंदिर परिसरात विविध भारतीय वाद्ये वाजवतील, असे मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक पंथांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान या मान्यवरांना संबोधित करतील.
सर्व शास्त्री नियमांचे पालन करून दुपारी मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. तसेच या प्राणप्रतिष्ठा समारंभात 121 आचार्य अनुष्ठान करणार आहेत. गणेश्वर शास्त्री द्रविड हे अनुष्ठानच्या सर्व कामकाजावर देखरेख, समन्वय आणि दिग्दर्शन करणार आहेत आणि मुख्य आचार्य काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित असतील.
भारतीय अध्यात्मवाद, धर्म, संप्रदाय, उपासना पद्धती, परंपरा या सर्व शाळांचे आचार्य, 150 हून अधिक परंपरांचे संत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्रीमहंत, महंत, नाग, तसेच 50 हून अधिक आदिवासी, गिरीवासी, ताटवासी, द्विपवासी आदिवासी परंपरा, भव्य श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्रांगणात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.