अयोध्या : अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी, जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी सर्व ‘सनातन’ अनुयायांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“मी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ‘सनातन’ धर्मातील सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा देतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात आणि आचरणात प्रभू रामाची वैशिष्ट्ये समाविष्ट करावीत अशी माझी इच्छा आहे. तसेच आज प्रभू राम ‘वनवास’ वरून अयोध्येत परतल्यासारखा आनंद आपल्याला अनुभवता येईल,” असे जगद्गुरू म्हणाले.
पुढे या भव्य सोहळ्याते आमंत्रण नाकारणाऱ्या लोकांबद्दल विचारले असता, जगद्गुरु म्हणाले की, “विनाश काळे विप्रित बुद्धी, मी त्यांच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.”
तसेच प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार असलेले योगगुरू रामदेव म्हणाले की, “देशातील रामराज्याची ही एक नवीन सुरुवात आहे. आज भव्य मंदिर उभारले जात आहे. सनातनचा नवा इतिहास आज निर्माण होत आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेने ‘रामराज्या’ची नवी सुरुवात होत आहे.”
राम मंदिराबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनीही भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, “हा भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. ही ‘रामराज्याची’ सुरुवात आहे. माझे मन भरून आले असून आम्ही खूप आनंदी आहोत.”
राम लल्लाची ‘प्राण प्रतिष्ठा’ आज 22 जानेवारी दुपारी 12.30 च्या सुमारास सुरू होणार आहे आणि दुपारी 1 वाजता संपेल. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या खास प्राणप्रतिष्ठा दिनी रामजन्मभूमी मंदिरात आरतीच्या वेळी अयोध्येवर लष्कराचे हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करतील आणि 30 कलाकार मंदिर परिसरात विविध भारतीय वाद्ये वाजवतील, असे मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले.