अखेर सर्व रामभक्तांची ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. कारसेवकांनी, राम भक्तांनी केलेल्या त्याग , संघर्ष याला आज अखेर यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विधिवत विराजमान झाले आहेत. या क्षणावेळी देशातील अनेक भागांमध्ये फटाके फोडून, मिठाई वाटून या क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला.
दरम्यान, प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाच्या मूर्तीची पाहिलीय छायाचित्रे समोर आली आहेत. रामलल्लाची मूर्ती सोन्याने मढवण्यात आली आहे. तसेच प्रभूंच्या हातामध्ये सोन्याचा धनुष्यबाण आपल्याला पाहायला मिळतो. रामलल्लाला सुंदर अशा पोशाख परिधान करण्यात आला आहे. सोन्याचे पितांबर आणि सोन्याचे धनुष्यबाण असे स्वरूप आहे.
दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लाची मूर्ती पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. याची देही याची डोळा हा क्षण पाहायला मिळाल्याने प्रत्येक रामभक्ताला कृतकृत्य झाल्याच्या भावना आल्या. जय श्रीरामच्या घोषणेने मंदिर परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्याच्या वेळी गर्भगृहामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.