अयोध्या : आज (22 जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.
या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला गणेशपुजनाने सुरूवात झाली. त्यानंतर हा प्राण प्रतिष्ठा विधी 12 वाजून 29 मिनिटांनी संपन्न झाला. रामलल्लाचा हा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर राम मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, आजचा हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जग लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे पाहत आहे. तसेच या सोहळ्याला अयोध्येत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. सोबतच रामल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्याने अयोध्येसह संपूर्ण जगभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.