नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या दिवशी भारतात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या भावना व्यक्त करताना UNGA अध्यक्ष म्हणाले की, “देश आपली ‘दुसरी दिवाळी’ साजरी करत असताना या शुभ दिवशी नवी दिल्लीत आल्याचा आनंद झाला आहे.
याबाबतची एक पोस्ट डेनिस फ्रान्सिस यांनी X वर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत डेनिस फ्रान्सिस म्हणाले की, “नमस्ते, भारत! देश आपली ‘दुसरी दिवाळी’ साजरी करत असताना या शुभ दिवशी नवी दिल्लीत आल्याने आनंद होत आहे. शांतता, प्रगती या विषयावर पुढील काही दिवसांत सकारात्मक चर्चेची अपेक्षा आहे.”
डेनिस फ्रान्सिस हे भारत-UN संबंधांना पुढे नेण्यासाठी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. तसेच डेनिस फ्रान्सिस यांचे विमानतळावर भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी स्वागत केले. परराष्ट्र मंत्री (EAM) एस जयशंकर यांच्या निमंत्रणावरून फ्रान्सिस 22 ते 26 जानेवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहेत.
नवी दिल्लीत, डेनिस फ्रान्सिस हे राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत. तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, 24 जानेवारी रोजी फ्रान्सिस हे भारतीय जागतिक घडामोडी परिषदेत (ICWA) “बहुपक्षीयता आणि शांतता, समृद्धी, प्रगती आणि शाश्वतता” या विषयावर जाहीर भाषण देतील.
दरम्यान, कडेकोट बंदोबस्तात अयोध्येत आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संत आणि अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत रामलल्ला ‘प्राण प्रतिष्ठे’चे ऐतिहासिक विधी पार पडले.