आज अयोध्येमध्ये श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधीवत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी गर्भगृहामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आजच्या अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त लिहिले आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, ”आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !”.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साकेत हेलिपॅडवरून मंदिराच्या उत्तर दरवाजाने मंदिरात दाखल झाले. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लाची मूर्ती पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. याची देही याची डोळा हा क्षण पाहायला मिळाल्याने प्रत्येक रामभक्ताला कृतकृत्य झाल्याच्या भावना आल्या. जय श्रीरामच्या घोषणेने मंदिर परिसर दुमदुमून गेला. , प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाच्या मूर्तीची पाहिलीय छायाचित्रे समोर आली आहेत. रामलल्लाची मूर्ती सोन्याने मढवण्यात आली आहे. तसेच प्रभूंच्या हातामध्ये सोन्याचा धनुष्यबाण आपल्याला पाहायला मिळतो. रामलल्लाला सुंदर अशा पोशाख परिधान करण्यात आला आहे. सोन्याचे पितांबर आणि सोन्याचे धनुष्यबाण असे स्वरूप आहे.