आज (22 जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
रामलल्लाचा हा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देश लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे पाहत आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा भव्य सोहळा लाईव्ह पाहिला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या सोहळ्याचे निमंत्रण मला देखील होते. मात्र, एकट्याने दर्शन घेण्यापेक्षा आमचे संपूर्ण मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार आहे. तसेच महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामलल्लाचे एक वेगळे नाते आहे. श्रीरामांचा आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत वनवास होता. तसेच चंद्रपुरातून राम मंदिरासाठी लाकूड गेले आहे. तर आजचा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. त्यामुळे आम्ही लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणार आहोत.
पुढे एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत. तसेच काही लोकांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, त्या लोकांना सुब्दुध्दी दिली पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केली आहे.