पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आज आपला उपवास सोडला आहे.गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते चरणामृत प्राशन करुन मोदींनी हा उपवास सोडला आहे. यावेळी पंतप्रधानांच्या ह्या निग्रहाचे कौतुक करताना गोविंदगिरी महाराज म्हणले की,” तप हा भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा शब्द आहे. आम्ही आज तो तप तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो ज्यामध्ये हे सारं काही होते त्या राजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज!” असे गोविंदगिरी महाराज म्हणाले आहेत.
त्यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि म्हणाले की,”लोकांना कदाचित ठाऊक नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्री शैलमवर गेले तेव्हा 3 दिवसांचा उपवास केला. 3 दिवस शिवमंदिरात राहिले. त्यानंतर महाराजांनी म्हटले की मला राज्य नको, . मी शिवाच्या तपश्चर्येसाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत नेऊ नका. त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावले की स्वराज्य निर्माण करणे हे सुद्धा तुमचे कार्य आहे. आणि राजांना परत घेऊन आले .
आज आपल्याला मोदींच्या रूपाने तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवले .
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होऊ शकली. मात्र त्याचबरोबर पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी सर्व नियमांचे पालन केले.यावेळी गोविंद देवगिरी महाराज यांनीही पंतप्रधान मोदींनी पाळलेल्या उपोषणाची माहिती दिली. प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होण्यापूर्वी पाळण्यात येणाऱ्या उपोषणाची माहिती पंतप्रधानांकडून मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तीन दिवसाच्या उपासाचा पर्याय उपलब्ध असतानाही मोदींनी ११ दिवसाचे कडक अनुष्ठान पाळले. त्यांनी याशिवाय पंतप्रधानांना केवळ तीन दिवस जमिनीवर झोपण्यास सांगितले होते, मात्र ते 11 दिवस सतत जमिनीवरच झोपले. तसेच त्यांनी त्यांचे सर्व विदेश दौरेही रद्द केले.
यावेळी बोलताना गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, की 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा क्षण पहायला मिळाला आहे. राम या देशाचा आत्मविश्वास आहे. देशात अशा प्रकारचं परिवर्तन आणण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन कार्याप्रती समर्पण करण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून मोदी मिळाले, हे देशाचंच नाही तर संपूर्ण जगाचे सौभाग्य आहे.